परमसद्गुरू श्री. गजानन महाराज
शिवपुरी, अक्कलकोट, महाराष्ट्र
कीर्तनकलाशेखर श्री. नारायण श्रीपाद काणे
कवठे गुलंद, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र
श्री. नारायणबुवा काणे, कवठे गुलंद (नरसोबाची वाडी) हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. पाच पिढ्यांची कीर्तनपरंपरा लाभलेल्या काणे बुवांची पूर्णवेळ कीर्तनकारिता वयाच्या १७ व्या वर्षांपासून ते अखेर पर्यंत म्हणजेच वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत - ६५ वर्षांहून अधिक काळ केवळ सेवाभावनेतूनच सुरू होती. शिवपुरी अक्कलकोट, येथील स्वामी समर्थावतार, अग्निहोत्राचे प्रणेते, परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे बुवांचे सद्गुरू. जवळपास २५ वर्षे बुवांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. कीर्तनातून अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे बुवांचे मुख्य कार्य होते. या माध्यमातून बुवांनी ३ वेळा भारतभर दौरा केला.
अलौकिक प्रतिभाशक्ती लाभलेल्या बुवांनी शेकडो काव्य, भक्ती रचना, स्तोत्रे, अष्टके रचली. "सप्तशती सोनाई", "गीत-गजानन", "गीत-समर्थायन" हे त्यातील मुकूटमणी ठरले.. सोपी पण अर्थपूर्ण व प्रवाही शब्दरचना, गोड व प्रसन्न चाल आणि दिव्य प्रासादिक आवाज.. असा गीतकार, संगीतकार व गायक अश्या तीनही रूपांनी बुवांचा परिस स्पर्श या रचनांना झाला. यापुढेही अनंत काळ या रचना श्रोत्यांना आनंद व साधकांना आत्मिक समाधान देत राहतील व मार्गदर्शक ठरतील.
२५ सप्टेंबर २०२० रोजी ब्रह्ममुहूर्तावर बुवांनी देह ठेवला व ते श्रीचरणी विलीन झाले. आदल्याच दिवशी बुवांनी गायलेली त्यांचेच शब्द आणि संगीत असलेली अर्थपूर्ण भक्तीरचना:
आदरांजली : कीर्तनकलाशेखर श्री नारायणबुवा काणे (सौजन्य: सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार)
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.